पुणे : राज्यात सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांपैकी ३.२२ टक्के प्रमाण हे ० ते १० वयोगतातील, तर ११-२० या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण ६.६३ टक्के आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लहान आणि किशोरवयीन मुलांमध्येही कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. गृह विलगीकरणाचे प्रमाण वाढल्याने घरातील प्रौढांकडूनच लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाला महाराष्ट्रात सुरुवात झाली. सुरुवातीच्या लाटेमध्ये लहान मुले आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये संक्रमणाचे प्रमाण अत्यंत कमी होते आणि मृत्यूदरही नगण्य होता. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक पुण्याने अनुभवला. सप्टेंबर महिन्यात ०-१० या वयोगटातील २२०४, तर ११-२० या वयोगटातील ३८९९ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले होते. मार्च २०२१ मध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असले तरी मृत्युदर नगण्य आहे. त्यामुळे घाबरून न जाता या काळात मुलांना जपण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
-----
काय आहेत मुलांमधील लक्षणे?
- ताप
- खोकला, सर्दी
- घसा खवखवणे, घशाला सूज येणे
- अंगदुखी, अशक्तपणा
----
सध्या लहान मुलांमध्ये ताप, घसा दुखणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश येणे अशी लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गरज नसताना पालकांनी मुलांना घराबाहेर घेऊन जाऊ नये. विलगीकरणाला सध्या खूप महत्त्व आहे. त्यामुळे घरात कोरोनाग्रस्त रुग्ण असल्यास सर्वांनी मास्क वापरावा. मुलांना रुग्णांपासून दूर ठेवावे. सातत्याने हात धुणे, मास्क घालणे यांचे महत्त्व एव्हाना मुलांना कळले असेल. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य त्यांना समजावून सांगावे.
- डॉ. संजय मानकर, बालरोगतज्ज्ञ
----
किशोरवयीन मुलांमधील कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. आठ वर्षांखालील मुलांना कोरोनाचा त्रास तुलनेने कमी आहे. पालकांचा संसर्ग मुलांना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांनी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे पाळावे. मोठ्या माणसांनी बाहेरून घरात आल्यावर आंघोळ केल्याशिवाय, कपडे बदलल्याशिवाय मुलांना जवळ घेऊ नये. मुलांना कोणतीही लक्षणे दिसल्यास सुरुवातीला तापाचे औषध द्यावे, एका दिवसात फरक न दिसल्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे. मुलांमध्ये लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेण्यात टाळाटाळ करू नये. सध्या फ्लू, गोवर यांचेही प्रमाण वाढले आहे. मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. फळे, हिरव्या भाज्या, भरपूर पाणी यांचा समावेश असावा. योगासने, हलका व्यायाम, प्राणायाम यावर घरातील सर्वांनीच भर द्यायला हवा.
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ
-----
महापालिका आकडेवारी :
वयोगट जानेवारी फेब्रुवारी मार्च
0-10 261 354 2250
11-20 459 704 4212