राजगुरुनगर/शेलपिंपळगाव : ‘आता माझी ही शेवटचीच निवडणूक असून मायबाप जनतेने एकदा संधी द्यावी,’ असे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले. राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी निर्धार तथा उमेदवारी अर्ज दाखल सभेत ते बोलत होते. या प्रसंगी रामदास ठाकूर, ऋषीकेश पवार, बाळशेठ ठाकूर, सुगंधा शिंदे, डी. डी. भोसले, तुकाराम कांडगे, निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, सतीश राक्षे, संध्या जाधव, वंदना सातपुते, वैशाली गव्हाणे, अरुण चौधरी, कैलास लिंभोरे, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, नवनाथ होले, विनायक घुमटकर, सयाजीराजे मोहिते, अरुण थिगळे, सतीश राक्षे, धैर्यशील पानसरे, बबनराव कुऱ्हाडे, संध्या जाधव, रूपाली जाधव, सुरेखा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.मोहिते-पाटील म्हणाले, ‘‘तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. लोकसभेला आम्ही डॉ. अमोल कोल्हेंना मोठे मताधिक्य देऊन खासदार केले. याउलट, सध्या तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले जात आहे. चाकणच्या मराठा आंदोलनातील मोर्चात सामील होऊन समाजासाठी भाषण केले; मात्र एका वर्षानंतर सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. विधानसभेपूर्वी मला जेलमध्ये पाठवून निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र, न्यायव्यवस्थेने मला जामीन मंजूर केला. त्यामुळे जनता आता अशा विचारांच्या लोकांना घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही.’’ या वेळी रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार, डी. डी. भोसले, तुकाराम कांडगे, वंदना सातपुते आदींनी भाषणे केली. सुनील थिगळे, पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ..........तालुक्यात ३० ते ३२ वर्षे राजकारण केले. सरपंच ते आमदार या काळात कोणी दुखावले गेले असेल तर माफ करा. विकासकामे करीत असताना एकाही रुपयाचा भ्रष्टाचार कधी केला नाही. मागील पाच वर्षांत आमदार नसतानाही तालुक्यातील जनतेने तसे जाणवू दिले नाही, असे मोहिते पाटील म्हणाले.
अखेरच्या निवडणुकीत एकदा संधी द्या : दिलीप मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:17 PM