पुणे : भाड्याने घेतलेल्या हॉटेलच्या कराराची मुदत संपली नसतानाही जबरदस्तीने डोक्याला पिस्तूल लावून ताबा घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जागेच्या मालकासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन विठ्ठल कामठे (वय ४०, रा़ रजनीगंधा अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे़ संतोष विठ्ठल कामठे, विठ्ठल कामठे व त्यांचा वाहनचालक व इतर तिघे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ ही घटना शिवाजीनगरमधील गोकुळनगर येथील रेनबो रेस्टॉरंट येथे १७ एप्रिल २०१८ रोजी घडली होती.
याप्रकरणी रोनाल्ड अल्मेडा (वय ३३, रा़ येरवडा) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले, की रोनाल्ड व त्यांचे भागीदार मारियो फर्नांडिस यांनी हे हॉटेलमध्ये असताना हॉटेलच्या जागेचे मालक कामठे व इतर जण तेथे आले़ त्यांनी रोनाल्ड यांना हॉटेल बंद करायला सांगून मारियो फर्नांडिस यांना शिवीगाळ केली़ रोनाल्ड यांनी आपल्यामध्ये ६० महिन्यांचा करार झालेला असताना तुम्ही हॉटेल का बंद करायला सांगता, असे विचारल्यावर संतोष कामठे यांनी त्याच्याकडील पिस्तूल रोनाल्ड यांच्या डोक्याला लावले व गल्ल्यातील ३८ हजार ५६५ रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच संतोष कामठे याने त्याच्याकडील पिस्तूल डोक्याला लावून त्यांना व फर्नांडिस यांना हॉटेलच्या बाहेर हाकलून दिले व जिवे मारण्याची धमकी दिली़ त्यामुळे ते दोघे जिवाच्या भीतीने पळून गेले़ रोनाल्ड यांनी दिलेली डिपॉझिटची रक्कम, हॉटेलमधील साऊंड सिस्टिम, हॉटेलचे नूतनीकरण केलेले फर्निचर, एसी़ मशीन्स, टीव्ही, प्रोजेक्टर मशीन, दोन संगणक, एक लॅपटॉप, डीजे प्लेअर, किचन साहित्य व इतर साहित्य जबरदस्तीने हडप केले़ रोनाल्ड यांना त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने इतके दिवस त्यांनी घाबरून फिर्याद दिली नव्हती़ सहायक पोलीस निरीक्षक सागर गरुड अधिक तपास करीत आहेत़