लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तिसरी लाट दूर ठेवायची असेल तर, नागरिकांनी अधिकची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कोरोना नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. या वेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. सुहास शेळके, डॉ. प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, जीवन माने, कबिरप्पा लातुरे, दिलीप पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, कोरोना कालावधीत इंदापूर, वालचंदनगर आणि भिगवण या तीनही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी उत्तम कर्तव्य बजावले. ज्यावेळी तालुक्यात कोरोना बळावत होता, त्यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात या पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी जनतेसोबत काहीअंशी वाईटपणा घेतला; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने वाढणारी संख्या वेळीच आटोक्यात आणता आली.
फोटो ओळ : इंदापूर येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.