जेजुरी : पुरंदर तालुक्यात मार्च महिना अखेरीसच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र स्वरुपाच्या पाणीटंचाईमुळे गावठाण आणि वाड्या- वस्त्यावरून पिण्याच्या पाण्याचे नियोजन होऊ शकले नसल्याने सर्वसामान्यांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक घटकाला पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे बनले आहे. शेतकऱ्यांचे पशुधन चारा-पाण्याअभावी बाजारात विक्रीस जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी तालुक्यात आमसभा घ्यायला हवी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांत एकदाही आमसभा झालेली नाही. पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षीचे पर्जन्यमान सरासरीच्या निम्मेच राहिले होते. सप्टेंबर महिनाअखेर पुरंदरचे सरासरी पर्जन्यमान केवळ २५५ मि.मी. होते. यात परिंचे व गराडे परिसरातील पश्चिम पुरंदरच्या पट्ट्यात सुमारे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडला होता. इतरत्र पावसाचे प्रमाण केवळ ६० मिमी ते १५० मि.मी. येवढेच राहिल्याने ओढे नाले वाहू शकले नव्हते. यामुळे तालुक्यातील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम तसे सुमारच राहिल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठीही पिण्याचे पाणी, चारा तसेच रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्याचेच निदर्शनास येत आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचे टँकर प्रस्ताव आणि त्यांचे नियोजन यापलीकडे कोणतेही नियोजन नाही. टँकरबाबत प्रस्ताव आल्यानंतरच पाहणी व मंजुरी दिली जाते. गेल्या वर्षभराची वस्तुस्थिती जाणून घेऊन तालुका प्रशासनाने स्वत:हून पुढाकार घेऊन प्रत्येक गावातील पाहणी करून नियोजनाची अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. टँकरच्या प्रस्तावानंतर टँकर सुरू झालेले आहेत. तरी ही गावपातळीवरील राजकारणाचा फटका अनेक वाड्या व वस्त्यांना बसतो, हा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता नियोजन आवश्यक आहे. पुरंदर तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठाही अल्पच असल्याने येथून करण्यात येणारा पाणीपुरवठा हा गाळमिश्रित व अशुद्ध आहे. टंचाईच्या काळात सर्वसामान्यांना अशुद्ध पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचेही नियोजन आवश्यक आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्थानिक पाणीपुरवठा योजना आहेत. त्या योजनांचे उद्भव कोरडे पडलेले आहेत. यावर्षी तालुक्यातील पश्चिम दक्षिणपट्टा वगळता इतर सर्वच खेड्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. (वार्ताहर)
दुष्काळी स्थितीबाबत आमसभा घ्यावी
By admin | Published: March 25, 2017 3:37 AM