कोरेगाव भीमा : लोकमान्य टिळकांनी ज्या सामाजिक भावनेमधून व तरुणांची शक्ती राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोग करुन घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आज गणेश मंडळे पुरता विसरली आहेत. मात्र, आनंदनगर प्रतिष्ठानने गणरायाच्या चरणी प्रसादाऐवजी ‘एक वही एक पेन’ अर्पण करण्याचे आवाहन करुन सामाजिक रुप उत्सवाला दिले. गणरायाच्या चरणी जमा झालेले शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श इतर गणेश मंडळांनी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी केले.
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील आनंदनगर प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोतस्व काळात गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिक व महिलांनी प्रसादाऐवजी ‘एक वही एक पेन’ आणण्याचे आवाहन केले होते. या आवाहानातून जमा झालेल्या शालेय साहित्याचे कोरेगाव भीमा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी जितेंद्र गव्हाणे, अॅड. सचिन गव्हाणे, लक्ष्मण गव्हाणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रणव गव्हाणे, सागर कापसे, रोहित गायकवाड, अक्षय सुतार, कृष्णा देशमुख, ऋषिकेश तांबे, गणेश राऊत, सौरभ शिंदे, शिवराज कौटकर, नितीन चौरे, दिनेश पाटील, नितीन मागाडे आदी उपस्थित होते. यावेळी ५३१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.सचिन गव्हाणे यांनी आनंद नगर प्रतिष्ठाणच्या वतीने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतही पोलिसांकडे सुपूर्द केली. जितेंद्र गव्हाणे यांनी गणेश मंडळांसाठी पुढील वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘गणराया अॅवार्ड’ देणार असल्याचे जाहीर केले. गणेश मंडळांनी आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. सूत्रसंचालन तुकाराम सातकर यांनी केले. आभार मुख्याध्यापिका बांदल यांनी मानले.