पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कुदळवाडी येथे गाेवरचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून गाेवर हा मुंबईतून पुण्याच्या वेशीवर आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता नऊ महिने ते पाच वर्षांच्या आतील बालकांना गाेवरचा डाेस न दिल्यास ताे आराेग्य केंद्रातून घ्यावे, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गाेवरचा एक उद्रेक नाेंदवला आहे. एका विशिष्ट भागात चार आठवड्यांच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक गाेवर संशयित रुग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दाेन रुग्ण प्रयाेगशाळा तपासणीत गाेवरबाधित आढळल्यास त्याला गाेवरचा उद्रेक, असे म्हणतात. यावर्षी राज्यात असे ७४ उद्रेक झालेले आहेत. त्याद्वारे राज्यात ११ हजार ३९० संशयित, तर त्यामधून ७१७ रुग्ण गाेवरबाधित आढळले आहेत. त्यात पिंपरी- चिंचवडमधील आठ रुग्णांचा समावेश आहे, तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील सर्व निगेटिव्ह
ज्या बालकांच्या अंगावर पुरळ आली आहेत, ताप आला आहे, त्याचे नमुने पुणे महापालिकेकडून तपासणीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत अशा १५४ पेक्षा अधिक बालकांचे नमुने पाठवले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवडने आतापर्यंत २५६ नमुने पाठवले असून, त्यापैकी आठजण बाधित आढळले आहेत.
ही आहेत लक्षणे
गाेवर हा विषाणूंमुळे हाेणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र, लसीकरणामुळे ताे टाळता येताे. ताे प्रामुख्याने पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये आढळताे. ताप, खाेकला, वाहते नाक, डाेळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर व नंतर उर्वरित शरीरावर लाल सपाट पुरळ येते. ही या आजाराची लक्षणे आहेत. गाेवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमाेनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदुसंसर्ग संसर्ग अशी गुंतागुंत हाेऊ शकते.