लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपरिषदामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ साठी मार्च महिन्यात केंद्रीय समिती पाहणी करणार आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित मुख्याधिकारी यांनी सदर अभियानांतर्गत दिलेल्या घटकांची सुव्यवस्थित व प्रभावी अंमलबजावणी करा. यासाठी सर्व मुख्यकार्यकारी यांनी दर मंगळवार व शुक्रवारी प्रत्यक्ष सर्व प्रकल्पांना भेट देऊन आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबविणेच्या अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी
ओडीफचा दर्जा, रिसर्टीफिकेशन, शंभर टक्के घनकचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचरा वाहनांना जीपीएस यंत्रणा, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा जागेवर प्रक्रिया, नाला व गटर सफाई, योजनेत नागरिकांचा सहभाग नोंदवणे, पुरेशी प्रसिध्दी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व सफाई, नागरीकांच्या स्वच्छता ॲपवरील तक्रारींवर मुदतीत उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे तयारीबाबत इतर उपाय योजना करणेसाठी प्रत्येक मुख्याधिकारी यांनी सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणे व सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
माझी वसुंधरा अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी करीता वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे.
या सर्व बाबी पाहता पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित मुख्याधिकारी यांनी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी आपल्या क्षेत्रात सकाळी ६ ते ८ वाजेपावेतो प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून सहभाग नोंदवावा व त्याबाबतचे फोटो स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान जिओटॅग या DRIVE वर संबंधित नगरपरिषदेचे फोल्डरवर अपलोड करावेत व सदर अभियानाची आपल्या क्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.