पुणे : आर्थिक, सामाजिक विषमतेमुळे समाजात मोठी दरी निर्माण झाली असून त्यामुळे समाजापुढे उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा विचार युवकांनी केला पाहिजे. तसेच या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याशिवाय सामाजिक परिस्थिती बदलणार नाही, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी व्यक्त केले.युवा दिनाच्यानिमित्ताने साधना साप्ताहिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठी विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. गाडे बोलत होते. याप्रसंगी आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळेलिखित ‘तीन मुलांचे चार दिवस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, नाटककार अतुल पेठे, विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे समन्वयक डॉ. मनोहर जाधव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.गाडे म्हणाले, ‘‘देशात समानता प्रस्थापित व्हावी, अशी भावना तरुणांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक वृत्तीने पाहण्याचा दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक गोष्टीचा पूर्वग्रह न ठेवता विचार करावा. तसेच त्याच गुणवत्तेचे लेखन करावे.’’कार्यक्रमात या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. तसेच मिलिंद बोकील, मनोहर जाधव, विनोद शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाकर देसाई यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
सामाजिक प्रश्नांसाठी पुढाकार घ्या
By admin | Published: January 13, 2017 1:56 AM