पुणे : केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना एखाद्या विषयावर प्रत्यक्ष प्रयोग करता यावेत आणि त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करून ज्ञान घेता येणार आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकामध्येच प्रयोगांची माहिती वाचावी लागते. परंतु, त्यांना प्रत्यक्ष प्रत्येक प्रयोग करता येत नाही. त्यामुळे तो त्यांना संपूर्णपणे समजतही नाही. प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती तर होतेच; पण विज्ञानाबाबत गोडीही निर्माण होते. त्यामुळे विद्यापीठाकडून सायन्स पार्क तयार करण्यात आले आहे. या पार्कचे उद्घाटन विज्ञान दिनी म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात येईल. या दिवशी शंभराहून अधिक प्रयोगही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या पार्कची रचना करण्यात आली आहे. पुस्तकातील अनेक प्रयोग या ठिकाणी प्रत्यक्षात करण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल.एका वेळी शंभर विद्यार्थ्यांना या सायन्स पार्कमधील प्रयोग पाहता येतील, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या पार्कच्या माध्यमातून विविध कार्यशाळाही घेण्यात येणार असून, शाळांनी या सायन्स पार्कसाठी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष प्रयोगाची घ्या अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:24 AM