बारामती : लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय समाज पक्षाला विश्वासात घेऊन प्रचारयंत्रणा राबवावी; अन्यथा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारातून अलिप्त राहावे, असा सूर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावला.
बारामती लोकसभा निवडणूक प्रचार यंत्रणेत घटकपक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाला भाजपकडून डावलले जात असल्याबद्दल रासप कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रासपच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक बारामतीतील एका हॉटेलमध्ये घेण्यात आली. या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, अण्णासाहेब रूपनवर, माणिकराव दांगडे-पाटील, संदीप चोपडे, विनीत पाटील, हरीश खोमणे, डॉ. विनय दगडे, बापूराव सोलनकर, विष्णू चव्हाण, मारुती गोरे, स्वप्निल मेमाणे, सतीश शिंगाडे यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दांगडे पाटील म्हणाले, की बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून भाजपच्या वतीने बैठकांचा सपाटा सुरू आहे. उमेदवार महायुतीचा, अन बैठक मात्र दोन पक्षांच्या. या बैठकींना रासपच्या कार्यकर्त्यांना डावलेले जात आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला महायुतीच्या उमेदवारांच्या दौºया वेळी निमंत्रित केले जात नाही. यामुळे प्रचारापासून अलिप्त राहाण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी या बैठकीत दिला. तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र रासपचे संस्थापक तथा राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, अहिल्यादेवी शेळी मेंढी व उद्योजकता महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी कार्यकर्त्यांना सबुरीने घ्यावे, असे सांगत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचारात सक्रिय होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची भूमिका मांडली. यानंतर महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पुढील प्रचार यंत्रणा राबविण्याचा ठराव एकमुखाने पारीत करण्यात आला.