घोडेगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातून कळमजाई, बोरघर व फुलवडे या उपसासिंचन योजना करण्यासाठी लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ही कामे सुरू करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांसह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप आदी उपस्थित होते.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील गावांना डिंभे धरणाचे पाणी देण्यासाठी या तीन योजना अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. या योजना व इतर कामे करण्यासाठी कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असल्याने प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पाटबंधारे विभागाने राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडे प्रयत्न करावेत. मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. आवश्यकता असल्यास मार्च महिन्याच्या बजेटमध्ये यासाठी काही अंशी निधीदेखील दिला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले. आदिवासी योजनांसाठी बजेटमध्ये ६३ कोटी रुपये आहेत. यापैकी ६ कोटी रुपये रस्त्यांसाठी आहेत. हा आदिवासींचा नियतवे १२५ कोटी रुपयांपर्यंत वाढवला जावा, अशी मागणी जिल्हा नियोजनमधून केली जावी, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली.
कुकडी प्रकल्पाला सुधारित मान्यता घेऊन पुढील कामे करा : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:39 IST