पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या सदस्यांची कोविडसाठी सरकारच्या सेवेत जाण्याची तयारी आहे. आताही अनेक डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. पण सध्या आपले नर्सिंग होम, क्लिनिकमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांऐवजी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचा त्यासाठी प्राधान्याने विचार करायला हवा. तसेच आयुर्वेद व होमिओपॅथिक डॉक्टरही काम करण्यास तयार आहेत, त्यांनाही सेवेत संधी द्यावी, असे ‘आयएमए ’महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले.राज्य शासनाने दवाखाने बंद न ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून सरसकट सर्वांनाच नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच सध्या गरजेनुसार खासगी डॉक्टरांना सरकारी सेवेत घेतले जात आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना डॉ. भोंडवे म्हणाले, आयएमएचे सदस्य असलेल्या बहुतेकांचे दवाखाने उघडे आहेत. पण परिचारिका व इतर कर्मचाºयांअभावी हे दवाखाने पुर्ण क्षमतेने चालविता येत नाहीत. शासनाने ५५ वषार्पुढील डॉक्टर तसेच गर्भवती किंवा एक वर्षांपेक्षा लहान बाळ असलेल्या महिला डॉक्टरांना यातून वगळले आहे. सेवा देताना बाधा झाली तर ५० लाखांचा विमा, मानधन या बाबीही मान्य केल्या आहेत. तसेच स्वत:चे दवाखाने बंद ठेवणारे डॉक्टर आणि आयुर्वेद, होमिओपॅथिक डॉक्टरांना सेवेत घ्यायला हवे. सध्या सेवा देत असलेल्या डॉक्टरांनाच शासकीय सेवेत घेतल्यास दवाखाने बंद पडतील. तज्ञ डॉक्टरांना सेवा देता येणार नाहीत. याचा विचार करण्याची गरज आहे.पुणे शहरातील अनेक दवाखाने सध्या विविध कारणांमुळे बंद आहेत. अनेकांनी कर्मचारी नसल्याने बंद ठेवले आहेत. तर काहींनी भीतीपोटी बंद केले आहेत. याबाबत प्रशासन सर्वेक्षण करून त्यांचा शोध घ्यायला हवा. दवाखाने सुरू असलेल्यांनाच नोटीस पाठविली जात आहे. आम्ही सरकारला सर्वप्रकारचे सहकार्य करायला तयार आहोत, असे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.------------
कोरोनाच्या संकटकाळात दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना प्राधान्याने सेवेत घ्या : डॉ.अविनाश भोंडवे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 3:23 PM
आम्ही सरकारला सर्वप्रकारचे सहकार्य करायला तयार आहोत.
ठळक मुद्देआयुर्वेद व होमिओपॅथिक डॉक्टरही काम करण्यास तयार