पुणे : शहरात कोयत्याने तोडफोड करीत दहशत माजविणाऱ्या गुंडांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. पाेलिसांनी गुंडांच्या मनात धाक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
स्वारगेट पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य तसेच देशभरातून अनेकजण नोकरी, रोजगाराच्या शोधात शहरात येतात त्यांची माहिती पोलिसांकडे नाही. शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे साेपे जाईल. शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सूचना दिल्या आहेत. गंभीर गुन्हे करणाऱ्या सराइतांना जामीन मिळू नये. गुन्हा सिद्ध करून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सरकारी वकिलांनी प्रयत्न केले पाहिजेत.
महिला आणि बालकांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे
पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या बालकांना भीती वाटू नये तसेच त्यांना सहज बाेलते करता यावे, यासाठी बालस्नेही कक्षाची मदत हाेईल. पुणे शहरात सर्व ठाण्यात बालस्नेही कक्ष स्थापन करण्यात येतील. त्यासाठी सीएसआर फंड आणि जिल्हा नियाेजन समितीकडून निधीही दिला जाईल. देशभरातील पोलीस ठाण्यात याप्रकारे बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. महिला तसेच बालकांच्या तक्रारी प्राधान्याने साेडविल्या पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.