धनकवडी : परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु तो हेतु परस्पर चव्हाट्यावर मांडणे ही मनोविकृती म्हणावी लागेल. औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला असून त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये पायदळी तुडवणारी असल्याने या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे संबंधित व्हिडिओ क्लिपसह एका निवेदनाद्वारे केली.
तृप्ती देसाई म्हणाल्या, औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल आणि सिल्लोड येथील महिला कीर्तनकार यांच्याशी संभोग करतानाचा व्हिडिओ बाळकृष्ण मोगल याने जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A आणि IPC 292 अंतर्गत त्याच्या वर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठा मान आहे. राज्यात अनेक कीर्तनकार समाजप्रबोधनाचे काम करतात. परंतु अलीकडे या पेशामध्ये काही कुप्रवृत्ती शिरल्याने वारकरी संप्रदायाची नाहक बदनामी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भागवताचार्य, अखिल भारतीय वारकरी मंडळ ता.अध्यक्ष, बाळकृष्ण महाराज रामभाऊ मोगल (वय- ४८ ,मु. वैरागड ,भटाणकर वस्ती, ता. वैजापूर) आणि सिल्लोड तालुक्यातील महिला कीर्तनकार यांनी विवाहबाह्य संबंध सहमतीने प्रस्थापित करून संभोग केला. धक्कादायक बाब म्हणजे बाळकृष्ण महाराज मोगल याने संभोग करतानाचा पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, असा अश्लील व्हिडिओ हजारो लोकांच्या मोबाईलमध्ये व्हायरल झाला ही गंभीर बाब आहे.
तातडीने गुन्हा दाखल करावा
खाजगी आयुष्यातील चार भिंतींच्या आतमधील झालेली नैसर्गिक क्रिया जरी एकमेकांच्या संमतीने झाली असेल तरी जाणीवपूर्वक सोशल नेटवर्कवर व्हायरल केल्याचे या प्रकरणात दिसत आहे. सामाजिक स्वास्थ, निकोप समाजिक जीवनासाठी ही बाब घातक असून तरुण पिढीच्या मनावर परिणाम करणारी आहे.समाजाला उपदेश करणारे किंवा समाजाचे प्रबोधन करणारेच जर असे गुन्हा करणार असतील तर त्यांच्या वर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. यास्तव सदर कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A आणि IPC 292 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी तृप्ती देसाई यांनी मागणी केली.