पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. त्यावेळी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे आणि इतर महिलांना अमानुष मारहाण केली. याप्रकरणी वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आज दुपारी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली.
''दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे शहराच्या दौऱ्यावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागीय अध्यक्षा सौ. वैशाली नागवडे त्यांच्या समवेत आणखीन तीन महिला सहकार्यासमवेत “बालगंधर्व रंगमंदिर, पुणे" येथे महागाई विरोधातील निवेदन देण्याकरिता गेले असता भाजपचे पदाधिकारी भस्मराज तिकोणे, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांनी महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. वरील या तीन समाजकंटक व्यक्तींवर या पूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांची पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचे कळते. सदर व्यक्तींवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास त्यांच्याकडून पुढील काळात फार मोठ्या प्रमाणावर समाज विघातक कृत्य घडण्याचा धोका आहे. तरी कृपया सदर वरील व्यक्तींवर कायद्यानुसार योग्य ती कडक कारवाई व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.''