काँग्रेस भवनावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:59 PM2019-12-31T20:59:11+5:302019-12-31T20:59:52+5:30
काँग्रेस भवन हे महात्मा गांधीपासून अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदस्पर्शाने पवित्र ठिकाण आहे़.
पुणे : उध्दव ठाकरे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भोरचे आमदार संग्राम थोपटे समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात शिरुन जोरदार तोडफोड केली़ ही काँग्रेसची संस्कृती नाही़. ज्यांनी हे केले आहे़ त्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही़ दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्थापनादिन दिमाखात साजरा झाला. दोन दिवसांपूर्वी येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. हे ज्यांनी केले आहे़ त्यांनी मोठे पाप केले आहे़. या सीसीटीव्हीमध्ये पाहून पोलिसांनी काँग्रेस भवनावर हल्ला केला. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे़.
काँग्रेस भवन हे महात्मा गांधीपासून अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदस्पर्शाने पवित्र ठिकाण आहे़. अशा प्रकारे आपली नाराजी व्यक्त करणे हे केव्हाही निषधार्थ असल्याचे बागवे यांनी सांगितले़. माजी अध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितले की, अशा प्रकारे नाराजी व्यक्त करण्याचे काँग्रेस भवन हे ठिकाण नाही़ आम्ही अशा वृत्तीचा निषेध करतो़.
इंटकचे अध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले की, येत्या ८ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी आम्ही करत होतो. त्याचे सर्व साहित्य कार्यालयात होते़ त्याची मोडतोड त्यांनी केली़ अशा प्रकारे तोडफोडीचा आम्ही निषेध करतो.
ही घटना घडली, त्यावेळी काँग्रेस भवनमध्ये ३ ते ४ जण होते. सहसचिव किर्ती भोसले यावेळी कार्यालयातच होत्या. त्यांनी सांगितले की, आम्ही ३ ते ४ जण शहर कार्यालयात होतो. साधारण साडेपाच वाजेपर्यंत २० ते २५ जण काँग्रेस भवनमध्ये आले़. ते मैदानात उभे राहून जोरदार घोषणाबाजी करु लागले़. त्यांच्यातील १० ते १२ जण शहराध्यक्षांच्या दालनात शिरले व त्यांनी हाताला येईल, त्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. सर्व खुर्च्यांची मोडतोड केली. बागवे यांच्या कार्यालयात लावण्यात आलेला एलइडी टीव्हीही त्यांनी फोडला. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला़ पण ते इतक्या द्वेषाने तोडफोड करत होते की घाबरुन आम्ही टेबलाखाली जाऊन बसलो़.
हल्लेखोरांनी बागवे यांचे कार्यालय फोडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारील इंटकच्या कार्यालयाकडे वळविला. अध्यक्ष कैलास कदम यांच्या केबिन व बाहेरील बाजूला असलेल्या शोकेसच्या काचा फोडल्या़. त्याच्या शेजारील केबिन बंद होती़. तेव्हा त्यांनी केबिनची काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला़.त्यानंतर त्यांनी केबीनमधील सर्व साहित्याची मोडतोड केली़. अगदी काँग्रेसचे बॅनर तसेच भिंतीवर लावलेल्या घड्याळाची काचही त्यांनी फोडली़. सुमारे १० ते १५ मिनिटे थोपटे समर्थकांचा हा हल्ला सुरु होता़. याची माहिती समजल्यावर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे़. शिवाजीनगर पोलिसांनी या मोडतोडीची पाहणी केली़.ही घटना समजताच कार्यकर्त्यांची गर्दी काँग्रेस भवनमध्ये होऊ लागली़.