पिंपरी : राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून पुरोगामी म्हणविणा-या महाराष्टÑासाठी ही चिंताजनक बाब आहे, जातीयवाद करणा-यांविरोधात गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घ्यावी, दलित अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलास योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणीही रिपब्लिकन पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असल्याच्या कारणावरून माणिक उदागे याच्या कुटुंबियांची खासदार आठवले यांनी आज चिखली येथे भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत रिपाइंतर्फे एक लाख रुपयांची मदत जाहिर केली. रिपाइं नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, प्रणव ओव्हाळ, भाजपचे एकनाथ पवार, प्रमोद निसळ, शैलेश मोरे आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले की, राज्यात २०१३ मध्ये दलित अत्याचाराच्या १ हजार ६३३ घटना घडल्या. तर चालू वर्षात मेच्या सुरुवातीपर्यंत ४१८ घटना घडल्या. त्यात प्रेमप्रकरणातून खर्डा येथील तरुणाचे झालेले हत्याकांड, जालन्यातील मातंग समाजातील सरपंचाची हत्या, कन्नडमधील दुर्देवी घटना आणि चिखलीतील माणिक उदागे या तरुणाचा खून आदींचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. याप्रकरणात राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या कुटंबातील एकाला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेऊ. (प्रतिनिधी)
अत्याचाराबाबत कठोर भूमिका घ्या - आठवले
By admin | Published: May 12, 2014 3:56 AM