Pune: सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 03:08 PM2024-06-10T15:08:59+5:302024-06-10T15:09:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला
किरण शिंदे
पुणे: देशात सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. सुप्रिया सुळे यांनी एक लाखाहून अधिक मतं घेत सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांसाठी (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही हा पराभव पचवणे जड गेले. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख असलेल्या अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) राज्यसभेवर घेण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्त पुण्यातील नारायण पेठ येथील पक्ष कार्यालयात एक छोटेखणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनिता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय विभक्त झाले. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेला. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. आणि या निवडणुकीत काय झाले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक जागा मिळवल्या. प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीतही शरद पवार गट विजय झाला. तर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला.
दरम्यान पराभव झाल्याने सुनेत्रा पवारांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न अधूरे राहिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळेच की काय पुण्यात आज झालेल्या बैठकीत याविषयी ठराव करण्यात आला. सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यासंबंधीचा हा ठराव पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात देखील आला आहे. त्यामुळे या ठरावावर अजित पवार काय निर्णय घेतात? सुनेत्रा पवारांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होते काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.