पुणे : शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभाच गेली दोन वर्ष अर्थात मार्च २०२२ नंतर झालीच नाही. दुसरीकडे निवडणूक रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाहीत, परिणामी पुणेकरांचे प्रश्न प्रशासनासमोर येत नाहीत. हीच अडचण विचारात घेऊन दैनिक 'लोकमत'ने विशेष 'लोक'जीबीचे आयोजन केले आहे. बाणेर रस्त्यावरील 'यशदा'च्या सभागृहात मंगळवारी (दि. ५) सकाळी १० वाजता याची सुरूवात झाली.
यावेळी सर्व पक्षीय माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे सभागृहात हातोडा घेऊन आले. 'निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारचं' अशा पोस्टरची वेशभूषा करून आलेले मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लक्ष वेधून घेतले. वसंत मोरे यांनी सभागृह प्रवेश केल्यावर काही नगरसेवकांनी घोषणा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांनी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा विषय मांडला. शहरात झालेले चुकीचे फुटपाथ, मेट्रोच्या बारगळलेल्या कामावरही ठपका ठेवला. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाची मागणी मानकर यांनी या जीबीत केली. यावेळी बोलताना काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. गेल्या दोन वर्षांपासून नाही तर 2017 पासून काहीच काम शहरात झाले नाही. बागुल यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे बागुल यांनी लक्ष वेधले