BJP Chandrakant Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कथित वक्तव्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य करताना केलेल्या आपल्या विधानातून अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचा समज झाल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही जोरदार पलटवार केला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी स्पष्टीकरण देत मी केलेलं वक्तव्यं प्रसारमाध्यमांनी अर्धवट दाखवत आमच्यात वाद निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "माझ्या एका वाक्याचा मीडियाने विपर्यास केला. मी जे बोलले त्याची क्लिप माझ्या खिशातच आहे. मी असं म्हटलं होतं की, मी पालकमंत्री असताना असं काही घडलंच नाही, असा दावा करणं चुकीचं आहे. मात्र तुम्ही घडलंच नाही, इथपर्यंतचंच वाक्य दाखवलं. मी पुढे असंही म्हणालो की, अशा घटनांसाठी एखाद्या मंत्र्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे. आता मी जे काही बोललो त्याची क्लिपही अजितदादांना दाखवा," अशा शब्दांत पाटील यांनी वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमका काय आहे वाद?
ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत, असं म्हटलं होतं. त्यानंतर सारवासारव करताना पाटील यांनी , "अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना?" असं म्हटलं.
अमोल मिटकरींनी दिले होते प्रत्युत्तर
“चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत,” असं म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.