पुणे : अामिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव वाॅटर कप स्पर्धेत यंदाच्या वर्षी साताऱ्यातील टाकेवाडी या गावाने प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पारिताेषिकाचे वितरण करण्यात अाले. बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा पारिताेषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विराेधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, अमृता फडणवीस अादी उपस्थित हाेते.
प्रथम क्रमांक मिळालेल्या टाकेवाडी या गावाला वाॅटर कप ट्राॅफी अाणि 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात अाला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सातारच्या भांडवली अाणि बुलडाणाच्या सिंदखेडा या गावांना विभागून देण्यात अाला. 25 लाख रुपये प्रत्येकी अाणि सन्मानचिन्ह असे पारिताेषिक या गावांना देण्यात अाले. तर तृतीय क्रमांक बीडच्या आनंदवाडी अाणि नागपूरच्या उमठा या गावांना विभागून देण्यात अाला या गावांना 20 लाख रुपये अाणि सन्मानचिन्ह देण्यात अाले. तर राज्य सरकारकडून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला 25 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गावांना 15 लाख रुपये तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या गावांना 10 लाखांचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
यावेळी बाेलताना अामिर खान म्हणाले, पानी फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील जनतेने बघितलेले स्वप्न आहे. महाराष्ट्राला समृध्द, पाणीदार बनविण्याचे हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्याचे काम केवळ सरकार, कोणतीही सेवाभावी संस्थेचे नाही तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून करण्याचे काम अाहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास ते साकार होणार आहे. स्वप्नपूर्तीची ही तर सुरूवात आहे. कोणत्याही गोष्टीची पूर्ती आपल्या हातात नसते मात्र ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारा प्रवास आपल्या हातात असतो, तो अत्यंत प्रामाणिकपणे करण्याची आवश्यकता आहे. एक दिवस नक्कीच महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होईल.