पुणे : शेतक-यांकडून कर्जाची वसुली 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शासनाकडून संस्थेस अनुदान मिळते. त्यासाठी तालुका लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करण्याच्या सक्षमीकरणाच्या प्रस्तावावरील शिफारशीकरिता केडगाव येथील सहकारी संस्थेच्या उपनिरीक्षकाने (वर्ग 3) तक्रारदाराकडून साडेआठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र ज्ञानेश्वर गाडे ( वय 51 ) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे दौंड येथील विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड येथे सचिव म्हणून नोकरीस आहेत. या संस्थेमार्फत शेतक-यांना कर्ज देणे व कर्जाची वसुली करणे हे काम केले जाते. शेतक-यांकडून कर्जाची वसुली 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शासनाकडून संस्थेस अनुदान मिळते.त्याकरिता तालुका लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव तक्रारदार यांनी गाडे या तालुका उपनिरीक्षकाकडे दिला होता.
गाडे याने तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या संस्थेचा 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या सक्षमीकरणाच्या प्रस्तावावरील शिफारशीकरिता 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी केली. यात गाडे याने तक्रारदाराकडून 8500 रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करीत ही रक्कम स्वीकारल्याने गाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपाअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.