युगंधर ताजणे
पुणे : ग्राहकांपुढे कुठलाही पर्याय नाही. हे ओळखून आता जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार ग्राहकांची लूट करू लागले आहेत. एरवी नाममात्र दरात मिळणाऱ्या कित्येक वस्तु 'अव्वाच्या सव्वा' दराने विकत घ्याव्या लागत आहेत. 'माल शिल्लक नाही, सर्व वाहतुक बंद आहे, परिस्थिती नियंत्रणात यायला किती वेळ लागेल सांगता येत नाही.' असे सांगून दुकानदारांची मनमानी वाढली आहे. लॉकडाऊन झाल्यापासून पोलीस प्रशासनाकडून 40 पेक्षा जास्त जीवनावश्यक दुकानदारांवर कारवाई केली आहे. गावाला जाण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे द्यायची आहेत त्याच्या झेरॉक्ससाठी कामगारांना पाच रुपये झेरॉक्सकरिता द्यावे लागत आहेत. गुळ, साखर, खोबरे, तेल, शेंगदाणा याचे भाव ठिकाणानुसार बदलत आहेत. कुठल्याही ' दुकानात जे आहे ते मिळेल, घ्या नाहीतर जा' असा सगळा प्रकार सध्या अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी देखील अद्याप काही नाठाळ विक्रेत्यांची मुजोरी सुरूच आहे. यापूर्वी कित्येकांनी बाहेरदेशात जाण्यासाठी काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे बुकिंग केले होते. आता सगळे रद्द झाल्याने त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केल्यानंतर पूर्ण रक्कम न देता 60 ते 70 टक्के रक्कम परत केली जात आहे. याविषयी विचारणा केल्यास सरकारी आदेशाचे कारण पुढे केले जात आहे.
* जीवनावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट असणारा गॅस सिलेंडरची वाढीव दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. घरपोच सिलेंडर देण्यासाठी अनेकजण 50 ते 100 रुपयांची मागणी करत आहेत. विशेषतः कोरोना संक्रमनशील भागात सिलेंडर घरपोच आणून देण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे.
* गावी जाण्यासाठी परप्रांतीय कामगार, मजूर, नागरिक यांची धडपड सुरू आहे. वाटेल ती किंमत मोजून गावी जायचे अशा तयारीत असणाऱ्या कामगारांना गंडवण्यात मालवाहतूक करणारे ट्रकवाले अधिक आहेत. दोन हजारापासून 4 हजार रुपयांपर्यत त्यांच्याकडून भाडे आकारले जात आहे. विशेष म्हणजे यात लहान मुलांचे वेगळे पैसे द्यावे लागत आहेत. हातात कुठलेही तिकीट नाही. 'यायचे असेल तर या, अन्यथा माघारी फिरा' या भाषेत मालवाहतूक करणारे त्यांना धमकावत आहेत.
* सॅनिटायझर आणि मास्कचा साठा करून त्याची अवैध मार्गाने विक्री सुरू आहे. मास्कवर कुठलीही किंमत नसताना काहीजण वाढीव दराला मास्क ग्राहकांना देत आहेत. सॅनिटायझरच्या बाबत देखील तीच गत आहे. सध्या तर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने सॅनिटायझर उपलब्ध झाले आहे. त्याच्या दर्जाबद्दल देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. 60 रुपयांपासून 100 ते 150 रुपयांपर्यत सॅनिटायझरच्या किमती आहेत. तर 50 ते 80 रुपयांपर्यंत मास्कची विक्री केली जात आहे. ग्राहकांना ज्या कंपनीचे सॅनिटायझर हवे आहे ते देता ' सगळे बंद आहे, अमुक एका कंपनीचे सॅनिटायझर कुठेच मिळणार नाही, हेच घ्या..' असे सांगून ज्यात जास्त 'मार्जिन' आहे ते सॅनिटायझर ग्राहकांच्या माथी मारले जात आहे.
* भाजीपाला तर कमालीचा महागला आहे. कोरोनामुळे हातगाडीवर फळे आणि भाजी विकणाऱ्या विक्रेत्याची 'चांदी' होत आहे. 40 रुपये कोथिंबीरची जुडी, 20 रुपयांत 3 लिंबे, किलोच्या दराने फळांची विक्री, 40 रुपये बटाटा, 60 रुपये लसूण, 20 रुपये पुदिना असे वाट्टेल त्या दराने भाजीपाला विक्री सुरू आहे. फळभाज्या ,पालेभाज्या यांचे दर आता सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाहीत.
* इतरवेळी माफक आणि वाजवी दरात मिळणारे चहाचे छोटे कप, कागदी ग्लास, प्लेट यांचे भाव चांगलेच वाढले आहेत. भुसार मालाचे काही व्यापारी माल शिल्लक नाही. जो आहे तो याच दराने देत घ्यावा लागेल. असे सांगत आहेत. या कारणाने अनेक चहाविक्रेते चहा वाढीव दराने, विकत आहेत. यासगळ्या मालाचे कुठल्याही स्वरूपात बिल मिळत नसल्याने तक्रार करण्यास ग्राहक तयार होत नाहीत.
* ऑनलाइन मद्यविक्री जशी सरकारने सुरू केली तसे किराणामालाची विक्री करावी. सध्या किराणा मालाच्या दुकानत गर्दी आहे. त्यात काही लूट आहे. भाजीपाला व्यवस्थित उपलब्ध असताना त्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ आहे. मार्केट कमिटीचे सतत बदलणारे नियम ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे मुख्य कंपनी, वितरक, यांच्याकडून होणारे वितरण 'ट्रान्सपोर्ट' खर्च वाढवला आहे. त्यामुळे साहजिकच किरकोळ विक्रेते आपल्या फायद्याकरिता मालाच्या किमती वाढवत आहेत. - विलास लेले ( राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत)