पुणे : घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चाचा मानलेल्या नराधमाने विश्वासाला तडा लावत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. न्यायालयाने परप्रांतीय आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी हा निकाल दिला. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला आहे. छबी मोहन सोनी (वय २५, रा. किरकटवाडी, मूळ उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
एप्रिल ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत किरकटवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत पीडितेच्या आईने हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले. तर न्यायालयीन कामासाठी हवालदार सचिन अडसूळ आणि नाईक किरण बरकाले यांनी मदत केली.
पीडित आठ वर्षांपूर्वी खानावळीचा डबा देत असल्याने सोनी तिच्या ओळखीचा होता. जास्तच ओळख निर्माण झाल्यानंतर पीडित, तिची आई, भाऊ आणि सोनी एकाच खोलीत राहत होते. रेशन, घरभाडे भरण्यास तो मदत करत असत. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे याबाबत पीडितेने कोणाला सांगितले नाही. पीडित गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मनौधर्य योजनेतंर्गत दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्याच्या सूचना राज्य सरकारच्या पीडितेला मदत देण्याच्या योजनेनुसार या प्रकरणातील पीडितेला मदत देण्याच्या सूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आलेल्या आहेत. दोन लाख किंवा नियमात बसत असेल तर दोन लाखांपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.