कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:22 AM2019-04-01T03:22:10+5:302019-04-01T03:24:08+5:30

आठवणीतील निवडणूक ...

Taking care of the leaders, the situation has changed | कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

Next

नि मगाव केतकीचा १९६१ मध्ये पहिला सरपंच, १९६२ मध्ये इंदापूर पंचायत समितीचा सभापती झालो. स्व. शंकरराव पाटील तालुक्याचे आमदार होते. १९६७ मध्ये शरद पवार पहिले आमदार झाले. अनंतराव पवारांच्याबरोबर छत्रपती भवानीनगर साखर कारखाना निवडणूक कार्यातून त्यांच्या संपर्कात आले. १९७६ पासून शंकरराव पाटील यांनी इंदिरा काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे काम चालू केले. १९८० मध्ये मी शरद पवार यांच्या एस. काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी आय. काँग्रेस उमेदवार राजेंद्र घोलप ४५०० मतांनी विजयी झाले. त्यावेळी शंकरराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्यांचा मतदारसंघात मोठा दबदबा होता. त्या वेळच्या निवडणूक यंत्रणा पाहिली तर प्रचारात जेमतेम चार-पाच गाड्या असत. त्याही ठिकठिकाणी डिझेलला पैसे नाहीत, म्हणून बंद पडायच्या, प्रचार थांबायचा. प्रचाराला निघताना घरातून भाकरीची चवड बांधून निघावं लागत होतं.

मला अजूनही आठवते, की माझ्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ व्याहळीच्या नाथाच्या मंदिरात वाढवून शुभारंभ केल्यानंतर लोकांनी त्याच ठिकाणी जमा केलेल्या वर्गणीत २५ हजार रुपये जमले होते. बाळासाहेब जाचक यांनी ५ हजार रुपये मदत केली होती. पूर्वी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत होते. लासुर्ण्याचे गुणवंतराव पाटील प्रचारातील कार्यकर्त्यांना जेवणासाठी ३० ते ३५ भाकऱ्यांची चवड, बेसन, चटणी घेऊन येत असत. प्रचार झाल्यानंतर दुपारी कोठेतरी झाडाखाली बसून जेवण करायचे. पुढच्या गावाला जायचे. एखाद्या गावात प्रचारासाठी जायचे असेल तर पुढे आदल्या दिवशी कोणीतरी पाठवून निरोप द्यायचा. त्यानंतर सभा होत असे. मोठ्या गावात सभेला ४० ते ५० लोक असायचे, लहान गावात १०-२० असायचे. आज तशी परिस्थिती राहिली नाही. कार्यकर्त्यांना एसी गाडी, चांगल्या हॉटेलात जेवण, पद, खर्चासाठी पैसे द्यावे लागतात. तरीसुद्धा रुसवे-फुगवे आहेत. पूर्वीचा कार्यकर्ता एखाद्याला शब्द दिला तर बदलत नव्हता, नैतिकता होती. तत्त्वाने वागणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या नेत्यासाठी उपाशी -तापाशी झटत असायचे. १९८५ च्या दुसऱ्या निवडणुकीत गणपतराव पाटील व माझ्यात झालेल्या लढतीत ५ हजार मतांनी गणपतराव पाटील निवडून आले. १९९० च्या तिसºया विधानसभा निवडणुकीवेळी एस. काँग्रेस आय. काँग्रेसमध्ये विलीन झाली. गणपतराव पाटील आय काँग्रेसमधून उभे होते. शंकरराव पाटील त्यांच्या पाठीशी होते. जनता दलातून विश्वासराव रणशिंग, शिवसेनेतून बलभीमराव जाधव आणि बंडखोरी करून हत्तीच्या चिन्हावर मी उभा होतो. त्यावेळी मराठा मताची विभागणी झाली. धनगर समाजाचे गणपतराव पाटील पुन्हा निवडून आले. तेव्हापासून तालुक्यात जातीय समीकरणाचे राजकारण चालू झाले. १९९५ ला हर्षवर्धन पाटील बंडखोरी करून निवडून आले. या राजकारणात आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. समीकरणे चुकत गेली आणि मी हळूहळू राजकारणातून बाहेर पडलो. समाजासाठी खूप पळालो. सणासुदीवेळी फक्त घरचं जेवण मिळायचे. इतर वेळी जिथे जाईल तेथे जेवण करायचे, अशी परिस्थिती होती. शरद पवारांचे माझ्यावर प्रेम असल्यामुळे आजही ते माझा शब्द ऐकतात. मला किंवा माझ्या मुलाला विधानसभेचे किंवा अन्य तिकीट नको आहे. फक्त पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नीरा-डावा कालव्यावर शेळगाव कटाचा सर्व्हे करून कचरवाडीचा तलाव शेटफळ हवेलीसारखा विस्तारित करून पावसाळ्यात पाण्याने भरण्याचे काम व्हायला पाहिजे. त्याचे भूमिपूजन पवारसाहेबांनी केले होते.

(शब्दांकन : अर्जुन भोंग)

ज. मा. मोरे
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Taking care of the leaders, the situation has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.