Bal gandharva Rangmandir: सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय घेतला; मुरलीधर मोहाेळ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:43 PM2022-05-13T19:43:13+5:302022-05-13T19:43:52+5:30
पुनर्विकासाचे काम अडीच वर्षातच पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींची
पुणे : बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे वैभव आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. काळाजी गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर जागतिक दर्जाचे रंगमंदीर म्हणून साकारण्यात येणार आहे. पुनर्विकासाचे हे काम अडीच वर्षातच पूर्ण करण्यासाठी वेळ पाळणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची नक्कीच जबाबदारी असेल, असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले आहे. तेव्हा पवार यांनी या पुनर्विकासाला सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरात आपली कला सादर करण्याची एकतरी संधी मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. त्यामुळे ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला नव्याने उभारण्याची आणि व्यापक करण्याची गरज होती. २०१८ साली स्थायी समिती अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली. परंतु, कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीत पुनर्विकासाचा विषय काही वेळ बाजूला राहीला. मात्र या काळात पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारद या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चा घडवून आणली, ज्यात पुनर्विकासाबाबत सकारात्मक कल दिसून आला. केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडेतीन लाख स्क्वेअर फुटांमध्ये विस्तारण्यात येणार आहे. सध्या १०० दुचाकी व २० ते २५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे. परंतु नवीन वास्तूमधे ९०० दुचाकी व जवळपास २५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन, एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन प्रेक्षागृह उभी राहणार आहेत. तर नव्या वास्तूमध्ये सुसज्ज असे १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन, अशी तीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. तसेच यात पु. ल. देशपांडे आणि ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत.
व्यापारी संकुल हा अपप्रचार
बालगंधर्वचा पुनर्विकास करताना त्यात व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार काहींकडून जाणीवपूर्वक केला जात असून यात काडीचेही तथ्य नाही. केवळ विरोधाराला विरोध म्हणून हा खोटा प्रचार केला जात आहे. कारण या पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिक कारणासाठी नसेल असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.