राजगुरुनगर : ज्यांनी निधी दिला, वेळोवेळी येऊन संस्थेचा कळस केला अशा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संस्थेच्या वार्षिक अहवालात घेतले नाही. पुतणा मावशीचे हे प्रेम आमदार व्हायला उपयोगात येणार नाही अशी कडवट टीका आमदार दिलीप मोहिते यांनी खेडचे माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांचे चिरंजीव आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एड देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या विरोधात केली. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणण्यासाठी खेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याचे व हा प्रकार विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगितले. लोकांच्या पैशावर उभारलेल्या संस्थेचे भरीव कार्य नाही. उलट स्वमालकी असल्याच्या अविर्भावात हेच पदे घेता आहेत. या माध्यमातून यांचे संसार सुरु आहेत. संचालक मंडळात माजी आमदार स्व साहेबराव सातकर यांच्या नातेवाईक व समर्थकांचे वर्चस्व असल्याचा असा मुद्दाही त्यांनी परिषदेत मोहिते पाटील यांनी अधोरेखित केला.
पाटील म्हणाले, संस्थेकडे कोट्यावधी रुपये शिल्लक असताना कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालया पलीकडे कोणतेही वाढीव दालन अध्यक्षाला उभे करता आले नाही. नुसत्या पदवी अभ्यासक्रमातून यांनी तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार वाढवण्याचे काम केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाही. गेल्या पाच वर्षात दुसरे महाविद्यालय सुरु झाले. किमान दोन किमी अंतर गरजेचे असताना एकाच आवारात दोन महाविद्यालय सुरु आहेत. पाईट येथे परवानगी असताना राजगुरुनगरला कॉलेज चालवले जाते. विनाअनुदानीत असलेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांचे विना पावती पैसे घेतले जातात. ही इमारत अनाधिकृत असून लगतच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. शिक्षक भरती करताना मोठ्या रकमा घेतल्या जातात.संचालक मंडळात वाटणी होते. मागील काळात कॉलेजसाठी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. त्याच्या चौकशी वरून काही संचालक राजीनामा देऊन घरी गेले. हा पैसा कुठे मुरला? असा प्रश्नि त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार होण्यासाठी लोकांमध्ये यावं लागतं
नव्याने सुरु केलेल्या महाविद्यालयाला साहेबराव बुट्टे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे .ते पहिल्या कॉलेजच्या नावातील बलिदानकर्त्या इतके मोठे आहेत का? ज्यांनी जमिनी दिल्या, पैसे दिले त्यांचा यांना का विसर पडला? असाही प्रश्न उपस्थित केला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. प्रत्येक उत्सव, कार्यक्रमात उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. पवार यांच्या उपस्थितीने अध्यक्ष आणि संचालक हुरळून गेले आहेत. त्याना डावलले तरी कोणी वाकडे करणार नाही. असे याना वाटू लागले आहे. ते सांगतील तेव्हा येतात त्यामुळे कधी ना कधी आपण आमदार होऊ असा काहींचा भ्रम निर्माण झाला आहे. मात्र नुसते एवढ्याने आमदार होता येणार नाही त्यासाठी लोकांमध्ये यावे लागते. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते. असे मोहिते पाटील खोचकपणे म्हणाले.