पुणे : दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाला सर्व मित्र, मैत्रिणींना बोलावते. आम्ही खूप धम्माल करतो. पण यावेळेस लॉकडाऊनमुळे ते शक्य होणार नव्हते...इतर कोणी नातेवाईकसुद्धा वाढदिवसाला येऊ शकणार नाहीत. वाढदिवसाला कुणीच नाही म्हणून ''ती '' चिमुकली हिरमुसली..पण अचानक सोसायटीच्या परिसरात पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. या सायरनमुळे सोसायटीच्या नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली. कोरोनामुळे पोलीस किंवा अॅम्ब्युलन्सचा आवाज कानावर आला तरी काहीतरी गडबड असल्याचे वातावरण निर्माण होते. आजही काहीेसे तसेच झाले. पण ते आले ते एका छोट्या पाच वर्षांच्या एका विनंतीला मान देऊन. त्याचप्रमाणे सोबत केक आणत तिचा धमाकेदारपणे वाढदिवस साजरा केला.
खरंतर सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात पोलिसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. दिवसरात्र कर्तव्य बजावत असताना स्वत:चा कोरोनापासून बचाव करतानाच कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे देखील मोठे आव्हान आहे. हे असताना एका विश्रांतवाडी परिसरातील पाच वर्षांच्या मायराने पोलीस काका, तुम्ही माझ्या वाढदिवसाला याल का? अशी विचारणा केली. लॉकडाऊन काळात संचारबंदी असल्यामुळे मायराला तिचा वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नव्हता. यासाठी तिच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिसांना वाढदिवसासाठी येण्याची विनंती केली.
पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे, हवलदार देविदास राऊत शिपाई सुशांत रणवरे, नितीन साबळे, आनंद रासकर यांनी मायरा हिला तिला तिच्या घरी जाऊन सोसायटीच्या आवारात "सोशल डिस्टनसिंग" चे पालन करीत वाढदिवस साजरा केला. यावेळी तिची आई राशी दहीकर, वडील योगेंद्र दहीकर तसेच टिंगरे नगर येथील तिरुपती कॅम्पस सोसायटीतील सर्व नागरिक आपापल्या गॅलरीमध्ये उपस्थित होते. पोलीस काकासह सोसायटीतील सर्व नागरिकांनी मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना आजाराच्या वाढता संसगार्चे पार्श्वभूमीवर पुणे शहरासह विश्रांतवाडी परिसरात कठोर संचारबंदी लागू आहे. समाजातील नागरिकांना अत्यावश्यक सुविधांसह त्यांच्या सुखदु:खामध्ये पोलीस प्रशासन सदैव हजर असते. मायराला तिचा वाढदिवस साजरा करताना तिच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांची कमतरता भासू नये यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी जाऊन तिचा वाढदिवस साजरा केला. या काळात सोशल डिस्टन्स चे महत्व सर्वांना कळावे, सगळ्यांनी आपली स्वत:ची कुटुंबाची काळजी घ्यावी. अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली. एवढा धावपळीत वेळात वेळ काढून मायरा हिचा अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल तिच्या आईवडिलांनी विश्रांतवाडी पोलिसांसह पुणे शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले.