कित्येक वर्षे प्रांताधिकारी स्तरावर तलाठी व मंडलाधिकारी यांच्या कार्यालयीन बैठका होत नव्हत्या. मात्र, हवेलीचे प्रांताधिकारी बारवकर यांनी कोरोनाचा कार्यकाल वगळता सातत्याने मासिक बैठकीवर जोर दिला. त्याचा परिणाम महसूल वसुलीच्या वाढीसाठी दिसून आला त्याचप्रमाणे प्रलंबित नोंदी निर्गत झाल्या. रजिष्टर दस्ताचा फेरफार घेतलेनंतर कित्येक महिने व दिवस फेरफारच्या नोटीसचा हरकत शेरा तलाठ्यांकडून भरला जात नसल्याचे वारंवार दिसून येत होते. यामुळे प्रलंबित नोंदीचा आकडा हा वाढतच जात होता.यावरुन बैठकीमध्ये प्रांताधिका-यांनी तलाठ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रलंबित नोंदी, एनए व गौणखनिज वसुली याबाबत आकडेवारीनुसार झाडाझडती घेण्यात आल्याने तलाठ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाचा चांगलाच धसका घेतला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीकृत ६२७० नोंदी, अनोंदणीकृत ११४९५१ नोंदी अशा एकूण १२१२२१ नोंदीपैकी ११५००० नोंदी निर्गत झाल्याने हवेली प्रांताधिका-यांची मात्रा चांगलीच लागू ठरल्याची चर्चा हवेलीत होऊ लागली आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांच्या बैठकीमध्ये प्रांताधिका-यांनी प्रलंबित कामाविषयी कडक धोरण अवलंबिले व कारवाईचा इशारा दिल्याने बहुतांशी तलाठी व मंडलाधिका-यांनी तत्काळ आपले डॅशबोर्ड रिकामे केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रजिस्टर दस्ताचे नोंदीसाठी तलाठी आर्थिक फायद्यासाठी नोंदी करत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात दाखल झाल्या होत्या त्याची विशेष दखल बैठकीमध्ये घेण्यात आली आहे.अजूनही नोंदणीकृत नोंदी ४५२, अनोंदणीकृत नोंदी१८१५अशा एकूण २२६७ नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते व आठ मंडल स्तरावर नोंदणीकृत १५३० नोंदी,अनोंदणीकृत ४६९१ नोंदी, असे एकूण ६२२१ नोंदी नोटीस व हरकत शेरा भरणे याकामी प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे.