भोर (पुणे) : लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठ्यास ५ वर्षे सश्रम कारावास तसेच १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.
खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणी करून स्वीकारल्याप्रकरणी लोकसेवक सीमा सुभाष कांबळे, तलाठी, सजा सारोळा, यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष न्यायाधीश श्री. पी.पी. जाधव, विशेष न्यायालय शिवाजीनगर, पुणे यांनी सदर खटल्यामध्ये न्याय्य निर्णय देऊन त्यामध्ये लोकसेवक सीमा सुभाष कांबळे यांना शिक्षा सुनावली आहे.
सरकारतर्फे सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी अभियोक्ता प्रेमकुमार अगरवाल व चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले. त्यांना अभियोग कामकाजामध्ये पैरवी पोलीस नाईक जगदीश कस्तुरे व पोलीस हवालदार अतुल फरांदे यांनी मदत केली. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.