मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील दामगुडा असनी येथे खरेदी केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोदवडी येथील तलाठी मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय ३४) यास लाचलुचपत विभागाने आठ हजाराची लाच स्विकारताना नसरापूर येथे रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील ब्रम्हमुहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरु दिपक शिळीमकर यांनी संस्थेच्या ज्ञानसा धना दामगुडा असनी येथे २० गुंठे जागा खरेदी केली. या खरेदीखताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी त्यांनी या गावचे तलाठी मुकुंद चिरके यांच्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र चिरके यांनी दहा हजार रुपये दिले तरच नोंद होईल अशी लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोड होऊन आठ हजार रुपये द्यायचे ठरवण्यात आले. या बाबत शिळीमकर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीबाबत खातरजमा झाल्यावर लाचलुचपत विभागाने आज सकाळी नसरापूर चेलाडी येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला होता.
शिळीमकर यांनी तलाठी चिरके यास त्या ठिकाणी बोलावून त्यांना लाचेचे आठ हजार रुपये दिले. त्याच वेळी लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल बिले आणि त्यांच्या पथकाने चिरके यास रंगेहाथ पकडले. चिरके याच्या कार्यपध्दतीबाबत कोदवडी परिसरात मोठी नाराजी असून, लाचेचे पैसे कमी असतील तर अंगावर फेकुन देऊन येवढ्यात काम होणार नाही. अशी अरेरावीची कृती व वक्तव्य देखिल त्याच्याकडून होत असे. अशी माहिती येथील नागरीकांनी दिली. तलाठी चिरके याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल बिले करत आहेत.