पुणे :तळवडे येथे स्पार्कल कॅंडल दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख देण्याचा हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
तळवडे येथे स्पार्कल कॅंडल कारखान्याला लागलेल्या आगीत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले होते. त्यानंतर जखमींवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी उपचार सुरु असताना प्रतिक्षा तोरणे (वय १६) आणि कविता राठोड (वय ४५) यांचा मृत्यू झाला. उर्वरित ८ रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यातील शिल्पा राठोड (वय ३१) यांचे सोमवारी (दि. १०) निधन झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी फोनवर चौकशी केली होती. तसेच जखमींना संपूर्ण उपचार वेळेत मिळतील, अशा सूचना केल्या होत्या. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठीचा प्र्स्ताव लवकरता लवकर देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
त्यानंतर देशमुख यांनी पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदारांना याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश दिले होते. हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शिंदे यांच्या सुचनेनुसार सर्व मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावेत असे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी या वेळी दिली.