अनेक दिवसांपासून रिक्त होती पदे : १६ गावांतील रुग्णांना मिळणार वेळेवर उपचार
तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून दोन वैद्यकीय अधिकारी व इतर पदे रिक्त असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल असे निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने अखेरीस दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून दोन वैद्यकीय अधिकारी व इतर पदे रिक्त असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच १४ सप्टेंबर रोजी निमगाव म्हाळुंगी येथील एका आठ वर्षीय बालिकेला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकारीच नसल्याने तळेगाव ढमढेरे येथे रुग्णांचे हाल, प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ पदे रिक्त, १६ गावातील रुग्णांना मिळेनात उपचार या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये( दि. ३) प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता, तर तळेगाव ढमढेरे येथे कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करा, अन्यथा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करू, असा इशारा देत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर-हवेली अध्यक्ष तेजस यादव यांनी १६ सप्टेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते, याची तातडीने दखल घेत तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी डॉ. संध्या कारंडे व डॉ. वर्षा गायकवाड या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर-हवेली अध्यक्ष तेजस यादव यांना दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर हवेली अध्यक्ष तेजस यादव, जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, जिल्हा जनहित कक्षाचे अध्यक्ष सुशांत कुटे, शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, प्रदीप पवार, नितीन वायकर, प्रमोद चव्हाण, कुणाल गुंजाळ, चंद्रकांत शेलार, वैभव पिंगळे, आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
250921\img_20210906_145604.jpg
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र