तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ७५.१९ टक्के मतदान झाले तर शिक्रापूर येथे ७९.८९ टक्के मतदान झाले.
शिरूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या तळेगाव ढमढेरे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १२ हजार ९३६ पैकी ९ हजार ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६ हजार ८३२ पैकी ४ हजार ७०० महिलांनी तर ६ हजार १०४ पैकी ५ हजार २६ पुरुषांनी मतदान केल्याची माहिती मतदान क्षेत्रीय अधिकारी फोंडे यांनी दिली. एकंदरीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
शिक्रापूर येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत १४ हजार २१९ पैकी ११ हजार ३६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ७९.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती मतदान क्षेत्रीय अधिकारी उद्धव ढापसे यांनी सांगितले. शिक्रापूरात दुपारी झालेल्या मतदान यंत्रातील बिघाडामुळे काही वेळ मतदान प्रक्रिया थांबल्याने सायंकाळी साडेपाचच्या वेळेनंतरही काही वेळ मतदार रांगेत असल्याने मतदान सुरूच होते.