विठ्ठलवाडी-भोसेवस्ती येथील नळपाणी पुरवठा योजनेची २५ एचपी मोटर नादुरुस्त झाल्याने ५ दिवसांपासून गावाला केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णता ठप्प आहे.
नरकेआळी येथील हातपंपावर सकाळ व संध्याकाळी पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे. काही ठिकाणचे हातपंप देखील नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी अक्षरशः विकत घ्यावे लागत आहे, तर काही ग्रामस्थ सध्या दूरवरून पाणी आणत आहेत. पाणी आणण्यासाठी विशेषता महिला वर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठा योजना सात किलोमीटर अंतरावरून भीमा नदीवरून आणण्यात आलेली असून, येथे २५ एचपीची मोटर बसवण्यात आलेली आहे. हे पाणी ग्रामपंचायतीपासून जवळच असणाऱ्या २ लाख २० हजार लिटर क्षमता असणाऱ्या जुन्या टाकीमध्ये, तसेच ८० हजार लिटर क्षमता असणाऱ्या नव्या टाकीमध्ये भरले जाते. नंतर टप्प्याटप्प्याने गावाला पाणीपुरवठा केला जातो, असे पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बापू शिंदे यांनी सांगितले.
भोसे वस्ती येथील पाणीपुरवठा केली जाणारी मोटर बिघडल्याने पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना समजण्यासाठी पाणीपुरवठा बंदबाबत नोटीस बोर्डवर सूचना लावण्यात आलेली आहे. पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मोटरच्या नादुरुस्त बेरिंग गुजरातवरून मागवण्यात आलेल्या आहेत. लवकरच मोटर दुरुस्त होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
-अंकिता भुजबळ, सरपंच,ग्रामपंचायत,
तळेगाव ढमढेरे)
तळेगाव ढमढेरे येथे हातपंपावर पाण्यासाठी महिला ग्रामस्थांची झालेली गर्दी)