तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना कंट्रोल कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य आरती भुजबळ, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, तलाठी ज्ञानेश्वर भराटे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, अविना आल्हाट,मयूर भुजबळ आदी उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरेमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ९३ असल्याने बैठकीत गाव बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर महसूल विभागाचे तलाठी ज्ञानेश्वर बराटे यांनी वरिष्ठांना माहिती दिली असता उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी १९ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत सात दिवसांसाठी तळेगाव ढमढेरे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.आरोग्य विभागाने तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कार्यक्षेत्र गावातीलच नागरिकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात, म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे मत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावामध्ये कालपासून सोडियम हायप्रो क्लोराईडची फवारणी युद्धपातळीवर सुरू केली आहे. आज शुक्रवार (दि.१६ एप्रिल) पासून संपूर्ण गावासह वाड्या-वस्त्यांवर कोरोना सर्वेक्षणाचेही काम वेगाने सुरू केले आहे.
संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी ,टाकळी भीमा ,निमगाव म्हाळुंगी ,कासारी ,कोंढापुरी, बुरुंजवाडी ,शिक्रापूर ,सणसवाडी, दरेकरवाडी, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, धानोरे या फक्त सोळा गावांतील नागरिकांनीच कोरोना चाचणीसाठी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे.
डॉ. प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे येथे आयोजित बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे.