पुणे : तब्बल ४०० दिवस घनदाट जंगलातील वास्तव्य...१५०० किलोमीटरचा पायी आणि १२०० किलोमीटरचा सायकलने केलेला प्रवास...जंगलात राहताना आलेले आश्चर्यकारक अनुभव...जंगलातील जैवविविधता....ऋतुमानानुसार होणारे बदल...प्राण्यांची जीवनशैली...आदिवासींचा सहवास असे संपूर्ण ४०० दिवसांचे नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले. ‘सूत्रधार’तर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. टॉक शोअंतर्गत निसर्गमित्र किरण पुरंदरे यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयोजिका मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे यांनी किरण पुरंदरे लिखीत कविता सादर केली. पुरंदरे म्हणाले, ‘जंगलात माणूस हस्तक्षेप करत नाही, त्यामुळेच ते अजूनही सुंदर आहे. एकाच पठडीत राहणे निसगार्ला मान्य नाही. त्यामुळेच जंगलात देखील प्रचंड विविधता दिसते. नागझिरा येथील ४०० दिवस हा विलक्षण अनुभव होता. तलावासाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात ३६ हजार तलाव आहेत.’ ते म्हणाले, ‘शहराच्या पलिकडचे आयुष्य हे अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता वास्तव्य करण्यासाठी टोकाचे वेड हवे असते. निसर्गाच्या जवळ आपण जायला हवे. त्याच्याशी संवाद साधायला हवा. प्रत्येक मूल जन्मत:च निसर्गमित्र असते. त्याच्यावर बालपणीच निसर्गाचे संस्कार व्हायला हवेत.’ यावेळी त्यांनी पावशा, भारद्वाज, रानकोंबडा अशा विविध पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढून उपस्थितांना थक्क केले.
‘टेल्स आॅफ नेचर’मधून उलगडले जंगलाचे साम्राज्य; ‘सूत्रधार’तर्फे पुण्यात टॉक शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:35 PM
‘सूत्रधार’तर्फे ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. यावेळी नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले.
ठळक मुद्दे‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शो अंतर्गत निसर्गमित्र किरण पुरंदरे यांची मुलाखतप्रत्येक मूल जन्मत:च निसर्गमित्र, त्याच्यावर बालपणीच निसर्गाचे संस्कार व्हावे : किरण पुरंदरे