कवठे येमाई (पुणे) : कवठे येमाई परिसरामध्ये सुखोई विमानाच्या ६० ते ७० फूट लांबीच्या मेटल पार्टचा पोलिस प्रशासन व वायुसेना अधिकारी पथकांद्वारे तातडीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुखोई विमानाचा ६० ते ७० फूट लांबीचा पाइपसदृश्य मेटल पार्ट १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२च्या दरम्यान सराव करताना कवठे येमाई ग्रामपंचायत आणि आसपासच्या परिसरात विमानातून पडल्याची शक्यता आहे. वायुसेनेची दोन पथके तत्काळ कवठे येमाई येथे दाखल झाली असून, या पथकांद्वारे विमानामधून पडलेल्या मेटल पार्टचा शोध सुरू झाला आहे.
कवठे येमाई येथील नागरिकांना दवंडीद्वारेदेखील सूचना करण्यात आली आहे, की लढाऊ विमानाचा हा महत्त्वाचा भाग कुणाला आढळल्यास वायुसेनेला कळविण्यात यावे. यावेळी कवठे येमाई ग्रामस्थ वस्तू शोधण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतील, असे आश्वासन पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे व सरपंच सुनीताताई पोकळे यांनी वायुसेनेच्या शोध पथकाला दिले आहेत. वायुसेनेच्या पथकाने गावामध्ये सर्वत्र पाहणी केली असून, कुठल्याही नुकसानीचे वृत्त नाही.