हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:15 PM2019-12-27T18:15:36+5:302019-12-27T18:29:27+5:30
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्याशी केलेल्या चर्चमागची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडताना पाटील यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप करून पक्ष सोडला होता.
पुणे :माझे आणि हर्षवर्धन पाटील यांची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी आम्ही काही एकमेकांचे बांध रेटले नसल्याचे सांगत अजित पवार यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.
पुण्यात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध मुद्दयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्याशी केलेल्या चर्चमागची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडताना पाटील यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप करून पक्ष सोडला होता. त्यानंतर पवार यांनी पाटील यांच्याशी गुफ्तगू करत राजकीय भांडण वैयक्तिक नसल्याचं सांगत पडदा टाकला.
पुढे ते म्हणाले की, 'मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी माझ्या नावाची पती होती. मी साधा आमदार आहे, त्यामुळे माझ्या नावाची पाटी सरकवून त्याआधी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची पाटी ठेवली. त्याशेजारी मी बसलो जिथे बाजूला पाटील होते. पक्षाच्या भूमिकांच्या मर्यादा पाळायच्या असतात. सारखेसारख्या महत्वाच्या विषयासाठी आम्ही एकत्र आलो होतो. त्यामुळे राजकारणाव्यतिरिक्त बोलणे झाले. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही असेही सांगायला ते विसरले नाहीत. आम्ही दुश्मन नाही आणि एकमेकांचा बांधही रेटलेला नाही असं सांगायलाही ते विसरले नाहीत. कर्जमाफीचा श्रेय घेण्याचा कोणताही वाद महाविकास आघाडीत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. याबाबत मुंबईत बोलणे झाले असून तीनही पक्षांच्या प्रमुखांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विचारांच्या स्थानिक पक्षप्रमुखांकडून एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार असून तिथे एकमत नाही झालं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र
पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते देऊ नये कारण ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावतील असे वक्तव्य केले होते. त्यावर पवार यांनी बोलताना, 'आम्ही त्यांचं सरकार असताना असं काहीही वक्तव्य केले नाही. १०५ जागा निवडून येवूनही त्यांचं सरकार बनलं नाही याच त्यांना दुःख आहे. अधिवेशन काळातही त्यांनी काही व्यक्तव्य केली होती, ज्याला ठाकरे यांनी उत्तर दिले होते. मात्र त्यांच्यासाठी त्यांनी 'चोराच्या मनात चांदणे' किंवा 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' अशी म्हणही त्यांनी वापरली. यावेळी पक्ष देईल ते पद स्वीकारण्यास तयार असून राष्ट्रवादीला एखादे महत्वाचे खाते मिळू शकते असे सूचक विधानही त्यांनी केले.