अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा; शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यात मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:09 PM2023-04-17T20:09:36+5:302023-04-17T20:09:47+5:30
अजित पवार यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीपत्रक जाहिर केल्यावर या चर्चांना पुर्णविराम
बारामती : राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याच्या, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे राजकीय डाव प्रतिडाव सुरु असल्याची चर्चा रंगली असतानाच सोमवारी(दि १७) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यातच रमल्याचे चित्र दिसून आले.
बारामती येथे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आंतराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान भरविले आहे. त्यासाठी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शरद पवार या कुस्त्यांच्या मैदानात पोहचले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सोमवारी(दि १७) पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द झाल्याच्या चर्चेने ,तसेच या पार्श्वभुमीवर भाजपचे वरीष्ठ नेते दिल्लीत गेल्याच्या या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अजित पवार यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीपत्रक जाहिर केल्यावर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. अजित पवार यांच्या कार्यालयाने जाहिर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार सोमवारी अजित पवार यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. ते मुंबईतच असून मंगळवारी(दि १८) विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, कार्यालयाचे कामकाज नियमित सुरु राहणार आहे. मंगळवारी अजित पवार आमदारांची बैठक बोलविल्याच्या बातम्या पुर्ण असत्य आहेत. आपण कोणतीही बैठक बोलावली नसल्याबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला.
दरम्यान सोमवारी(दि १७) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सासवड येथील मेळाव्याला संबोधून माळेगांव(ता.बारामती) मध्ये पोहचले. त्यानंतर माळेगांव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या सभेला पवार उपस्थित राहिले. त्यानंतर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शरद पवार बारामती येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पोहचले.कुस्ती हा खेळ पवार यांच्या आवडीचा असल्याने पवार मैदान पाहण्यातच रमुन गेल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी दिसून आले.