खेड : खेड तालुक्याच्या राजकारणाची पातळी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. तालुक्याला दोन बाप आहेत का, या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात व्यासपीठावरच जुंपली. आव्हान आणि सबुरीचे सल्ले परस्परांना देण्यात आले. तालुक्याला बाप असतो असे अनाहूतपणे या वेळी सूचित करण्याचा प्रयत्न झाला. कार्यक्रमानंतर तालुक्याचा ‘बाप’ कोण, यावर चर्चा रंगली.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा उल्लेख त्यांचे समर्थक जाहीर कार्यक्रमांमधून करतात. विरोधक म्हणजे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत काही मंडळींना मोहिते यांना आमदार म्हणणे रुचत नाही. त्यातून कधी स्पष्ट नाराजी तर कधी परस्परांना कोपरखळ्या मारून त्यांची भावना व्यक्त होत असते. मोहितेसमर्थकही आपला हट्ट सोडत नाहीत. असाच एक प्रसंग एका खासगी कार्यक्रमात घडला आणि तालुक्याला बाप किती, असा प्रश्न जाहीररीत्या विचारला गेला.राजगुरुनगर येथे एका खासगी कार्यक्रमाचे निमंत्रित होते खा.शिवाजीराव आढळराव, आ. सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते. सूत्रसंचालन सुनील थिगळे करीत होते. थिगळे यांनी पुन्हा एकदा दिलीप मोहिते यांचा उल्लेख आमदार असा केला.पूर्वाश्रमीचे मोहितेसमर्थक व सध्या आमदार गोरे समर्थक असणारे जि. प. सदस्य बाबाजी काळे यांना हा उल्लेख जरा जास्तच खटकला. ते निवेदकास उद्देशून म्हणाले,‘ तालुक्याला किती बाप आहेत? जी पदे त्यांच्याकडे आहेत त्याचाच उल्लेख कर, अन्यथा बोलू नको.’ एकेरीत हे घडत असताना आढळराव, गोरे, मोहिते यांची उपस्थिती होती. हमरीतुमरीवर हे प्रकरण आले.एकेरीतील तू तू... मै मै.. आणि तालुक्याचा बाप हा विषय उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय झाला.क्षुल्लक गोष्टीवरून वादामुळे नागरिकांमध्ये नाराजी.माजी आमदार मोहिते यांनी भाषणादरम्यान, काळे तुम्हीही आमदार होऊ शकता जरा सबुरीने घ्या. जनता लवकरच ठरवेल, की आजी-माजी आमदार कोण ते असा टोला मारला. खासदारांनीही कोपरखळी लगावत बरे झाले मोहिते सबुरीचा सल्ला देऊ लागलेत, असे प्रतिपादन केले.