सुपे (पुणे) : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजारात शनिवार ( दि. १८ ) पासून चिंचेच्या लिलावास सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून व चांगल्या पॅकिंगमध्ये आणावी असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी प्रसिद्ध अशी जुनी बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर इत्यादी तालुक्यातून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून शेतकरी चिंच विक्रीसाठी येत असतात.
दरम्यान चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता सुरू होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल लिलावापूर्वी आणावा. मागील वर्षीच्या हंगामात सुमारे ४७ हजार ६०० पोत्यांची आवक झाली होती. त्यावेळी अखंड चिंचेला सरासरी २१०० रुपये तर फोडलेल्या चिंचेला सरासरी ६५०१ रुपये बाजार मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद, हैदराबाद आदी भागातून खरेदीदार येत असतात अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी दिली.