किरण शिंदे
पुणे: स्वप्निल धावडे, पुण्यातील ३८ वर्षाचा उमदा तरुण. बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू, भारतीय सैन्य दलातून वर्षभरापूर्वीच निवृत्त झाला होता. दोन दिवसांपूर्वी ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीत ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकिंग पूर्णही झालं होतं. आता परत निघण्याची वेळ होती. मात्र प्लस व्हॅलीत असलेल्या कुंडात पोहण्याचा मोह स्वप्निलला आवरला नाही. आणि इथेच घात झाला. मोठ्या धाडसाने स्वप्निल पूर्णपणे भरलेल्या कुंडात उडी मारली खरी. मात्र त्याला बाहेर पडता आलेच नाही. पाण्याच्या प्रवाहात स्वप्निल वाहून गेला. स्वप्निल ने उडी मारण्यापासून ते वाहून जाण्यापर्यंतचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि हा संपूर्ण व्हिडिओ शूट केलाय स्वप्निलच्याच मुलीने. नेमकं काय झालं पाहूयात.
त्यादिवशी स्वप्निल 32 जणांचा ग्रुप घेऊन ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीत पर्यटनासाठी गेला होता. त्यात स्वप्नीलची मुलगीही होती. या 32 जणांनी दिवसभर पर्यटनाचा आनंद घेतला. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर हे सर्वजण परतीच्या वाटेवर निघालेही होते. मात्र प्लस व्हॅलीत असलेला पाण्याने भरलेला कुंड स्वप्निलला खुणावत होता. या कुंडात पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही. परत निघण्याच्या शेवटच्या क्षणी त्याने कुंडात पोहण्याचा निर्णय घेतला. कुंडाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मुलीला त्याने कुंडात उडी मारतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सांगितला. स्वप्निल ची मुलगी ही तयार झाली. मोबाईल कॅमेरा घेऊन ती कुंडाच्या दुसऱ्या बाजूला उभी होती. आणि पाण्याने भरलेल्या कुंडात स्वप्निलने उडी मारली. उडी मारतानाचा हा संपूर्ण ठरा त्याच्या मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैदही झाला. उडी मारल्यानंतर स्वप्निल ने बाहेर येण्यासाठी कुंडाच्या काठावर असणाऱ्या दगडांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला अपयश आलं. आणि पाहता पाहता तो कुंडाच्या पाण्यातून वाहून गेला. त्याचे हे सर्व प्रयत्न त्याची मुलगी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होती. आपल्या वडिलांसोबत जे घडलं ते तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. या संपूर्ण घटनेचा तिला मोठा धक्का बसलाय.
वाहून गेलेल्या स्वप्निलचा पौड पोलीस, ताम्हिणी वनविभाग आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते शोध घेत होते. मात्र ताम्हिणी घाट परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह रायगड तालुक्यातील माणगाव येथे सापडला. स्वप्निल धावडे हे बॉक्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळाडू राहिले असल्याची माहिती आता समोर येत आहे. इतकच नाही तर याच जोरावर त्यांची भारतीय सैन्य दलात देखील निवड झाली होती. वर्षभरापूर्वीच ते सैन्य दरातून निवृत्त झाले होते. तर स्वप्निलची पत्नी पिंपरी चिंचवड पोलीस दलात पोलीस असल्याचेही समोर आले आहे. स्वप्निल सध्या जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. जिममधीलच 32 जणांच्या ग्रुपसोबत तो पर्यटनासाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही.