नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर दुभाजक तोडून महामार्ग ओलांडून शेजारच्या शेतात १५ फूट खाली पलटी झाला. टँकर मातीत पडल्याने गॅस गळती झाली नाही. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्यास नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. हा अपघात सकाळी आठच्या सुमारास नसरापूरपासून सात किमी अंतरावरील वरवे गावाच्या शिवारात झाला.
अजय बाबासाहेब पाटील (वय ३२, रा. खामणपाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे जखमी चालकाचे नाव आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पाटील हा आज सकाळी गॅस टँकर घेऊन (एम.एच.१२/ के.पी. ०९२६ ) पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. वरवे गावाच्या नजिक टँकर आला असताना चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने तो पुणे-सातारा लेनचा डिव्हाडर तोडून उजवे बाजुस सातारा पुणे लेन क्रॅासकरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाजुचे शेतात जावून पलटी होवून अपघात झाला. मात्र शेतातील मातीमध्ये टँकर पलटी झाल्याने तो जास्त चेमटला नाही आणि त्यामुळेच त्याची गळती झाली नाही. मात्र संभाव्य गॅसचा धोका ओळखून भोर नगरपालिकेची अग्निशामक दलाची एक व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण दलाचे दोन अग्निबंब हजर होते. या अपघात ठिकाणी महामार्ग पोलीस सपोनी प्रवीण रणदिवे, चार पोलीस अंमलदार हजर होते तर महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित गायकवाड यांचेसह पेट्रोलिंग पथक व ॲम्ब्युलन्स हजर होत्या.
--
०१नसरापूर टँकर पलटी
सोबत फोटो : वरवे (ता. भोर) येथे सातारा पुणे महामार्गालगतच्या शेतात गॅसने भरलेला कंटेनर पलटी झाला.