चंदननगर (पुणे) : नगर रस्त्यावर चंदननगर येथील बीआरटीच्या भिंतीला धडकून तेलाचा टँकर रस्त्यावर उलटल्याने नगर रस्त्यावर पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वडगाव शेरीतील अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली होती.
मुंबईवरून लातूरला जाणारा गोडेतेलाचा टँकर मध्यरात्री चंदननगर भुयारी मार्गालगतच्या बीआरटीच्या भिंतीला धडकून उलटला. टँकर उलटल्याने नगर रस्त्यावर खुळेवाडी फाट्यापर्यंत तेल सांडल्याने वाहन घसरू नये म्हणून अग्निशामक दलाने व वाहतूक पोलिसांनी रस्ता एका बाजूने सुरू केल्याने पुण्यात येणारी व पुण्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची खराडी जुना जकात नाका व शास्रीनगरपर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी कोंडी झाली होती. मात्र, प्रशासनाला टँकर हटविण्यात यश आले नाही.
टँकरमधून मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने रस्त्यावर वाहने घसरू नयेत यासाठी अग्निशामक दलाकडून रस्त्यावरील तेल साफ करण्यात आले तसेच पालिकेच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकण्यात आली. चार-पाच क्रेनच्या मदतीने टँकर हटवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात तेल असल्याने हटवण्यास अडचणी येत होत्या.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने वाहने घसरत होती. त्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला, त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र, प्रशासनाला टँकर हटवता आला नसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
- महेंद्र पठारे, मा.नगरसेवक