पुणे: सिटी पोस्टच्या आवारात पुणे महानगरपालिकेचा टँकर अचानक खड्ड्यात पडला. सुदैवाने या धक्कादायक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु हा टँकर खड्ड्यात कसा गेला? याचं नेमकं कारण आता समोर आले आहे.
सिटी पोस्टची इमारत 1925 साली उभी करण्यात आली होती. त्यावेळी त्या इमारतीसमोर आणि आसपासच्या भागात विहीर आणि हौद होते. आता ज्याठिकाणी गणपतीच्या 10 दिवसात दगडूशेठ गणपती बाप्पा बसतो. त्याठिकाणी सुद्धा हौद होते. तर सिटी पोस्टच्या समोरच्या गल्लीतही हौद बांधण्यात आले होते. सिटी पोस्टच्या समोर श्रीकृष्ण टॉकीज आहे.त्याच्या खाली विहीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सिटी पोस्टची इमारत हे इंग्रजांनी केलेले बांधकाम आहे. त्याकाळात विहीर आणि हौद यांचा विचार करूनच त्यांनी या वास्तू उभ्या केल्या आहेत. त्यानंतर मात्र सिटी पोस्टमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीने याठिकाणी महापालिकेने रस्ता बांधला होता. त्यावेळी अवजड वाहनांची रहदारी याठिकाणी नव्हती. परंतु काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार याठिकाणी पोस्टाचे ट्रक येण्यास सुरुवात झाली. पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करताना त्याठिकाणी विहिरीवर स्लॅब टाकला. व पेव्हर ब्लॉकचा रस्ता याठिकाणी करण्यात आला. पेव्हर ब्लॉक टाकताना अवजड वाहनांचा विचार केला गेला नाही. तरीही या रस्त्यावरून पोस्टाचे ट्रक ये - जा करत होते. त्यामुळे ते पेव्हर ब्लॉक कमकुवत झाल्याची चर्चा स्थानिकांकडून ऐकायला मिळाली.
आयुक्त काय म्हणाले?
ट्रक खड्ड्यात गेल्याच्या ठिकाणी विहीर होती. त्या विहिरीवर स्लॅब टाकून पेव्हर ब्लॉकचा रस्ता करण्यात आला होता. पुणे महापालिकेचा ड्रेनिज साफ करण्याचा टँकर त्या रस्त्यावर आला. या टँकरच्या मशीनचे वजन खुप असते. रस्ता टँकरचे वजन अधिक काळ पेलवू शकला नाही. त्यामुळे दुपारी अचानक टँकर खड्ड्यात गेल्याचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.