पुणे : उन्हाच्या छळा तीव्र होत असतानाच शहरातही पाण्याची मागणी वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील टँकरच्या फेऱ्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल चार हजारांनी वाढल्या असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये शहरात सुमारे ११ हजार ९२२ टँकर फेऱ्या होत्या तर या वर्षी फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आकडा सुमारे १५ हजार १४२ फेऱ्या झाल्या आहेत.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये या वर्षी पावसाळा संपल्यानंतरही जेमतेम ५० टक्केच पाणी होते. त्यामुळे महापालिकेकडून आॅक्टोबर २०१६ पासूनच शहरात दिवसाआड पाणी देणे सुरू केलेले आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर जानेवारी २०१६ पर्यंत थंडी असल्याने पाण्याची मागणीही कमीच होती. मात्र, फेब्रुवारीपासूनच उन्हाळयाच्या छळा जाणवू लागल्या आहेत.फेब्रुवारीत चार वर्षांचा उच्चांक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात टँकरच्या मागणीने गेल्या चार वर्षांचा उच्चांक गाठला आहे. २०१२-१३ मध्ये ८ हजार ९००, १३-१४ मध्ये १२ हजार ४०० तर १५-१६ मध्ये १११ हजार ९०० टँकरच्या फेऱ्या शहरात झाल्या होत्या. मात्र, या वर्षी हा आकडा तब्बल १५ हजार १४२ वर पोहोचला असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून टँकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे.मागील वर्षी शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे पाण्याची मागणी या वर्षीच्या तुलनेने कमी असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शहरात सुमारे १ लाख ५८ हजार १६९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा या वर्षी ११ महिन्यांतच ओलांडला आहे. या वर्षी एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सुमारे १ लाख ६२ हजार ७११ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत चार हजारांनी अधिक आहे. तर दरवर्षी मार्च महिन्यात सुमारे १५ हजार टँकरची मागणी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वर्षी हा आकडा पावणेदोन लाख टँँकर फेऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.>>> विभागात २१० टँकरद्वारे पाणीपुरवठाविभागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, तब्बल ४ लाख ६८ हजार नागरिकांना २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गंभीर परिस्थिती असून, येथे तब्बल ७३ टँकर सुरू आहेत. गत वर्षी या वेळी विभागात केवळ १५ टँकर सुरू होते. विभागात आजअखेर २१० टँकरद्वारे तब्बल १८१ मोठी गावे आणि तब्बल १ हजार ३३० वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १०१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे ६४, सातारा ३६ आणि सोलापूर जिल्ह्यात ९ टँकर सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे विभागातील ४ लाख ६८ हजार ५०० लोक बाधित झाले आहेत.>>टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांची तालुकानिहाय स्थिती :पुणे : बारामती २२, इंदापूर १७, पुरंदर १२, दौंड १३, सातारा : माण २८, कोरगाव ४, वाई २, फलटण १,सांगली : जत ७३, खानापूर ७, तासगाव १२, कवठेमहांकाळ ६, आटपाडी २, कडेगाव १, सोलापूर : दक्षिण सोलापूर ५, अक्कलकोट ३ आणि करमाळा १
टँकर फेऱ्या चार हजारांनी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 1:45 AM