पुणे : शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेतील टाक्यांच्या वादग्रस्त निविदा प्रक्रियेचा चौकशी अहवाल आयुक्त कुणाल कुमार यांनी सरकारकडे सादर केला असल्याचे समजते. दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी या विषयावरून महापौर मुक्ता टिळक तसेच भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केला.या योजनेतील ८५ टाक्यांच्या बांधकामांची निविदा वादग्रस्त झाली आहे. एकाच कंपनीला काम मिळावे, या हेतूने आधी प्रसिद्ध झालेली निविदा रद्द करून नव्याने संबंधित कंपनीलाच फायदेशीर ठरतील, अशा अटी टाकून निविदा प्रसिद्ध केली असल्याची शंका यात व्यक्त होते आहे. त्यावरून आमदार अनंत गाडगीळ तसेच अनिल भोसले यांनी विधान परिषद अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. त्याची दखल घेत सरकारने चौकशी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी गेला तरीही काही हालचाल झाली नव्हती.मागील आठवड्यात सरकारने या निविदा प्रकरणाची चौकशी करावी, तसेच तोपर्यंत कामाला सुरूवात करू नये, असे आदेश दिले होते. मात्र योजनेच्या सादरीकरणापासून ते निविदा प्रकरणात ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे, त्या आयुक्त कुणाल कुमार यांनाच चौकशी करण्याचे त्या आदेशात म्हटले होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले आदींनी त्याचवेळी त्यावर आक्षेप घेत ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी केली होती.महापालिकेची सोमवारी सर्वसाधारण सभा होती. आयुक्त कुणाल कुमार या सभेला उपस्थित नव्हते. महापौर मुक्ता टिळक यांनी टाक्यांच्या चौकशीचा विषय निघाल्यानंतर आयुक्तांनी हा अहवाल सरकारकडे सादर केला असल्याचे सांगितले. त्यावरून तुपे, शिंदे, भोसले यांनी ज्यांनी सर्व केले, त्यांनाच त्याची चौकशी करण्यास सांगणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला. (प्रतिनिधी)
टाक्या निविदा प्रकरण सरकारकडे
By admin | Published: March 21, 2017 5:31 AM