पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरुमणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरयज्ञास मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैैदानावार आजपासून प्रारंभ झाला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने ‘तानसेन’ आणि ‘कानसेन’ यांचे सुरेल स्वागत केले. ‘सवाई’च्या स्वरमहालात पहिल्या दिवशी कल्याण अपार (सनई), रवींद्र परचुरे (गायन), बसंत काब्रा (सरोद), प्रसाद प्रसाद खापर्डे (गायन) आणि बेगम परवीन सुलताना (गायन) या कलाकारांचे सादरीकरण झाले.कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी महोत्सवाला सुरुवात झाली. त्यांनी सनईमधून गावती रागाचा सुरेल विस्तार केला. त्यांना नवाझ मिरजकर, संजय अपार (तबला), अनिल तोडकर, शेखर परांजपे, निवृत्ती अपार (सनई), वैष्णवी अवधानी, वैशाली कुबेर (तानपुरा), जगदीश आचार्य (सूरपेटी) आणि तुळशीराम अतकारे (स्वरमंडल) यांनी साथसंगत केली. पं. अरुण कशाळकर यांचे शिष्य असलेल्या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या रवींद्र परचुरे यांनी रसिकांवर सुरांची बरसात केली. आग्रा घराण्याचे वैशिष्टय असलेल्या नोमतोम आलापीने त्यांनी गायनाची सुरुवात केली. ‘दुखीयन के दुख दूर करो’, ‘मन लागा तुम संग मेरा’ या बंदिशी त्यांनी खुलवल्या. त्यांना प्रविण करकरे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शिवदीप गरुड, सुकृत गोंधळेकर (तानपुरा) यांनी साथ केली. पं. बसंत काब्रा यांच्या सरोद वादनाने संध्याकाळ रंगली. पं. काब्रा यांनी त्यांचे सादरीकरण त्यांच्या गुरू आणि ज्येष्ठ सतारवदक अन्नपूर्णा देवी यांना समर्पित केले. त्यांनी सरोदवर राग पुरिया धनश्री सादर केला. त्यांना सुधीर पांडे (तबला), अखिलेश गुंदेचा (पखावज) आणि पर्व तपोधन (तानपुरा) यांनी साथसंगत केली.यू-ट्यूब चॅनेलमधून ‘उलगडणार’ ‘सवाई’चे अंतरंगपुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सांस्कृतिक नगरीमध्ये सप्तसुरांची मनसोक्त उधळण होते. सूर, ताल आणि लय यांचा अनोखा संगम महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. आजवर अनेक दिग्गजांचा कलाप्रवास या स्वरमंचावर उलगडला आहे. हाच कलाप्रवास यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संकलित करण्यात आला आहे. भीमसेन स्टुडिओज हे यू-ट्यूब चॅनेल लवकरच सुरू करण्यात येत आहे. ‘अंतरंग’ कार्यक्रमातील सांगीतिक गप्पा या चॅनेलवर पाहावयास मिळणार आहेत. महोत्सवात शनिवारी या चॅनेलचे उद्घाटन होणार आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदा ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवांतर्गत ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ‘अंतरंग’ ची ओळख आहे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये गायन आणि वादन क्षेत्रातील अनेक कलाकारांशी ‘अंतरंग’ अंतर्गत संवाद साधण्यात आला आहे. कलाकाराची जडणघडण, कलेची जुळलेली नाळ, गुरुंची शिकवण, घराण्याची परंपरा, तरुणाईमधील संगीताची आवड अशा विविध विषयांचे पदर यादरम्यान उलगडले गेले. या सर्व मुलाखती यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून रसिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.जोशी म्हणाले, ‘यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती, पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा तसेच संवादात्मक कार्यक्रम आदींची ३५-४० एपिसोडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. यामध्ये गेल्या ५-६ वर्षांतील ‘अंतरंग’मधील मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.’ एका क्लिकवर या मुलाखती पाहता येऊ शकतील. शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये यू-ट्यूब चॅनेलचे अनावरण होणार आहे.सवाईच्या स्वरमंचावर यापूर्वीही सादरीकरणाची संधी मिळाली आहे. मात्र, यंदाच्या महोत्सवाचा श्रीगणेशा माझ्या सादरीकरणाने होत आहे, हे माझे भाग्य आहे. पं. भीमसेन जोशी आणि माझ्या गुरुंचे आशीर्वाद पाठीशी आहेतच.- कल्याण अपारसवाईच्या स्वरमंचावर सादरीकरण हे प्रत्येक कलावंतांचे स्वप्न असते. माझे ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. माझ्या वाटचालीत ललित कला केंद्राचा मोलाचा वाटा आहे.- रवींद्र परचुरे
तानसेन, कानसेनांचे स्वागत; स्वरयज्ञास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:07 AM